का- कसे-काय
जयहिंद कशासाठी ?
जयहिंद लोकचळवळ हे सुदृढ समाज निर्मितीचे लोकअभियान आहे. सुदृढ समाज हा प्रगत राष्ट्राचा पाया असतो. समाज सुदृढ असेल तरच ते राष्ट्र महान बनते, मात्र समाज सुदृढ नसेल तर देश कमकुवत व दुर्बल राहतो. अशा राष्ट्राला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष इतरांच्या गुलामगिरीत राहावे लागते.
जयहिंद काय ?
एक सुदृढ़ समाज आपली न्यायप्रियता, समंजसपणा आणि सदसदविवेकबुद्धि जागृत ठेवतो. अशा समाजात आर्थिक, सामाजिक व राजकीय समता असते. सर्व घटकांना अन्न, वस्त्र, निवारा यांच्याबरोबर जागतिक दर्जाचे शिक्षण व आरोग्य सेवा सुलभरीत्या उपलब्ध होतात.
सर्वांना रोजगार, दुर्बल घटकांना विशेष साहाय्य तर सक्षम लोकांना प्रगतीची विशेष संधी मिळते. असा समाज कायद्याचे राज्य तसेच राज्यघटनेच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत आग्रही असतो व संशोधन व कौशल्य विकासात भक्कम गुंतवणूक करतो .
हा समाज विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासत राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव व नैतिक मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य देणारा असतो त्यामुळे वैचारिक वा आर्थिक भ्रष्टाचाराला तो पाठीशी घालत नसतो.
जयहिंद कसे ?
युवा वर्ग आणि समाजातील सर्व प्रवाहातील स्त्री-पुरुषांना संघटित करून ही लोकचळवळ उभी करणे शक्य आहे युवकांना योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांच्यातून एक उत्तम नीतिवान कार्यकर्ता घडविणे गरजेचे आहे. या युवक कार्यकर्त्यांद्वारे सुदृढ समाज निर्मितीसाठी शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला सक्षमीकरण, युवा सक्षमीकरण, सुदृढ लोकशाही, पर्यावरण आदी. विषयात कृतिशील कार्यक्रम तयार करून ते प्रभावीपणे राबवले तर जागरूकता आणि बदलाची सुरवात होऊन अनुकूल जनमत तयार होईल.
समाजाच्या प्रगतीसाठी विविध विषयांवर अभ्यासगट तयार करून धोरण निश्चित करणे व शासनाला अशी धोरणे राबविण्यासाठी आग्रह धरणे गरजेचे आहे.