परिचय
जयहिंद लोकचळवळ
जयहिंद लोकचळवळ ही केवळ एक सेवाभावी संस्था नसून ही लोकचळवळ आहे. सुदृढ समाज निर्मितीच्या निर्धाराने सर्व वयोगटाच्या स्त्री-पुरुषांना संघटित करून, त्यांच्या सहाय्याने लोकांना बरोबर घेऊन हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. सुदृढ निरोगी निकोप समाज हा राष्ट्राचा पाया असतो, हा पाया भक्कम असेल तरच राष्ट्र सामर्थ्यवान व प्रगत बनते. हा पाया कच्चा असेल तर राष्ट्र कमकुवत राहते.
सुदृढ समाज म्हणजे काय? अशा समाजाची वैशिष्ट्ये काय असतात?
सुदृढ समाजातील सर्व घटक आनंदी असतात आणि समाधानी असतात कारण सर्वांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या असतात. सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्याच्या सुविधा पुरेशा व समाधानकारक मिळतात.
समाजातील सर्व नागरिक एकदिलाने एकात्म भावनेतून नांदतात, परस्परांवर विश्वास ठेवतात, त्यांचा परस्परांत सुसंवाद असतो, मतभेद निर्माण झाले तरी असे मतभेद चर्चेने व न्यायमार्गाने सोडविले जातात. असा समाज शांतताप्रिय व समजूतदार असतो. अशा समाजातील विविध जातीधर्माचे, पंथाचे, विविध भाषा बोलणारे लोक एकमेकांचा आदर करतात, त्यांच्या चालीरीती, संस्कृतीविषयी जिव्हाळा – प्रेम बाळगतात, कोणाविषयीही द्वेष-मत्सर बाळगत नाहीत. भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे. संतांनी दिलेल्या विश्वबंधुत्वाच्या शिकवणीप्रमाणे आचरण करणारी आहे. सर्वसामान्य जनता धर्म, जात, पंथ वा भाषा याविषयी संकुचित विचारांचे नसतात. अन्यथा महाराष्ट्राचा शिवाजी गायकवाड तथा अभिनेता रजनीकांत तामिळ जनतेच्या हृदयावर राज्य करू शकला नसता. रजनीकांतसारखी असंख्य उदाहरणे आहेत. समाजातल्या सर्व घटकांमध्ये प्रेम आपुलकी असली पाहिजे धर्माचा, जातीचा वा प्रदेशाचा अभिमान असावा परंतु अहंकार व एकमेकांविषयी द्वेष नको. आज जगात अनेक ठिकाणी स्वार्थासाठी जाणीवपूर्वक मत्सर आणि द्वेष पसरविला जातोय यामुळे सर्वांचेच नुकसान होते.
आपली लोकशाही ही समाजाच्या हिताची आहे. ‘जयहिंद लोकचळवळ ‘ही अशीच एक चळवळ आहे जी लोकशाही मार्गाने समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेऊन कार्यरत आहे. – डॉ सुधीरजी तांबे.
आपली लोकशाही ही समाजाच्या हितासाठी उपयुक्त आहे. ‘जयहिंद युवा चळवळ ‘ही अशीच एक चळवळ आहे जी समाजाच्या उन्नतीसाठी वाहिलेली आहे.
- डॉ सुधीरजी तांबे.