अध्यक्ष संदेश
आनंद म्हणजे जेव्हा आपण काय विचार करता, आपण काय म्हणता आणि आपण जे करता ते सुसंगत असते - महात्मा गांधी
आपल्या स्वार्थासाठी समाजात जाणीवपूर्वक धार्मिक जातीय द्वेष व तेढ निर्माण करणाऱ्या विघातक विचारांना समाजाने थारा देता कामा नये.
समाजातील सर्व नागरिक एकदिलाने एकात्म भावनेतून नांदतात, परस्परांवर विश्वास ठेवतात, त्यांचा परस्परांमध्ये सुसंवाद असतो, मतभेद निर्माण झाले तरी असे मतभेद चर्चेने व न्यायमार्गाने सोडविले जातात. असा समाज शांतताप्रिय व समजूतदार असतो. अशा समाजातील विविध जातीधर्माचे, पंथाचे, विविध भाषा बोलणारे लोक एकमेकांचा आदर करतात, त्यांच्या चालीरीती, संस्कृतीविषयी जिव्हाळा - प्रेम बाळगतात, कोणाविषयीही द्वेष-मत्सर बाळगत नाहीत. भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे. संतांनी दिलेल्या विश्वबंधुत्वाच्या शिकवणीप्रमाणे आचरण करणारी आहे. सर्वसामान्य जनता धर्म, जात, पंथ वा भाषा याविषयी संकुचित विचारांचे नसतात. अन्यथा महाराष्ट्राचा शिवाजी गायकवाड तथा अभिनेता रजनीकांत तामिळ जनतेच्या हृदयावर राज्य करू शकला नसता. रजनीकांतसारखी असंख्य उदाहरणे आहेत. समाजातल्या सर्व घटकांमध्ये प्रेम आपुलकी असली पाहिजे धर्माचा, जातीचा वा प्रदेशाचा अभिमान असावा परंतु अहंकार व एकमेकांविषयी द्वेष नसावा. आज जगात अनेक ठिकाणी स्वार्थासाठी जाणीवपूर्वक मत्सर आणि द्वेष पसरविला जातोय यामुळे सर्वांचेच नुकसान होते. "Eye for eye Makes whole world Blind" आपल्या स्वार्थासाठी समाजात जाणीवपूर्वक धार्मिक जातीय द्वेष व तेढ निर्माण करणाऱ्या विघातक विचारांना समाजाने थारा देता कामा नये.